
प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आपले दालन बेकायदा थंडा थंडा कूल कूल केल्यामुळे खोपाली नगरपालिकेचे अधिकारी घामाघूम झाले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात बेकायदा एसी लावले असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. दालनात बेकायदा एसी बसवणाऱ्या अधिकाऱ्यांनी खर्चाची बिले सादर केलेली नाहीत.
खोपोली शहरात प्रचंड समस्या असताना नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरण्यात येत आहेत. शहरात नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. शहरात विविध ठिकाणी विजेच्या खांबांची आवश्यकता आहे, रस्त्यांची * दयनीय अवस्था झाली आहे, गटारे नाहीत, साफसफाईचे तीनतेरा वाजले आहेत. या सर्व सुविधा पुरवण्याकरिता आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे उत्तर पालिकेमार्फत नेहमी दिले जाते. एकीकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करून विकासकामे लटकवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात महागडे एसी बसवले आहेत.
‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांच्या केबिनही थंडगार
नगरपालिकेच्या इमारतीतील ‘ब’ वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येसुद्धा नगर परिषदेने एसी लावले आहेत. एसी ल विण्याकरिता नगर परिषदेने कोणताही खर्च केलेला नाही, असे उत्तर नगरपालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिले आहे. नागरिकांच्या कराचे पैसे वाया घालवू नये व एसीचे बिल नागरिकांच्या करातून भरू नये अशी मागणी आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी केली आहे.