
विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली
शारदा चीट फंड घोटाळय़ाच्या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानावर मारलेली धडक आणि त्यांच्या पोलिसांनी सीबीआय अधिकाऱयांना पोलीस ठाण्यात खेचल्यानंतर मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. त्या संघर्षाचे पडसाद आज संसदेत उमटले. सीबीआयच्या दांडगाईविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दोन्ही सभागृहांत रणकंदन माजवले.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तृणमूलचे सौगात राय यांनी सीबीआय कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सभापती सुमित्रा महाजन यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करा, असे सांगत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, तृणमूलचे खासदार संतप्त होऊन वेलमध्ये येऊन त्यांनी गदारोळ सुरू केला. संविधान बचाओ मोदी हटाओ, लोकतंत्र बचाओ मोदी हटाओ, अशा घोषणांनी त्यांनी संसद दणाणून सोडली. त्यामुळे कामकाज सुरुवातीला दुपारी बारा व त्यानंतर दोनपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही गदारोळ
सीबीआयच्या पश्चिम बंगालमधील कारवाईच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज बाधित झाले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करण्याचे सूतोवाच केले खरे, मात्र तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी, सीबीआयच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज सुरुवातीला दुपारी बारा व त्यानंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले.
ममतांमुळे घटनात्मक ढाच्याला धोका
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारने चीट फंडची चौकशी करायला गेलेल्या सीबीआयच्या टीमला जेरबंद करणे, हे लोकशाहीच्या तत्त्वाविरोधात असून, बंगालातले सरकार भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आमच्या सरकारसोबत नसल्याचेच यावरून दिसून येते, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीबीआयच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले. भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेसाठी सीबीआयचे अधिकारी गेलेले असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळेच केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडी कोलकत्यात पाठविली असल्याचे राजनाथ यांनी सांगितले.
सीबीआयच्या दहशतीवर विरोधकांना संपविण्याचे कारस्थान
केंद्र सरकार सीबीआयच्या दहशतीवर राजकीय विरोधकांना संपविण्याचे कारस्थान करत असल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. बीजू जनता दलाचे भृतहारी मेहताब यांनीही गेल्या पाचसहा महिन्यांपासून सीबीआय ज्या पद्धतीने काम करत आहे ते अत्यंत अयोग्य आहे, अशी टीका केली. राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनीही सीबीआयच्या कारवाईचा निषेध केला.
भाजप-तृणमूलचे खासदार एकमेकांच्या अंगावर धावले
तृणमूल काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले सौमित्र खान यांना सभापती सुमित्रा महाजन यांनी सीबीआयच्या मुद्दय़ावर बोलण्याची परवानगी दिली. त्यावेळी खान यांनी, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी दादागिरी सुरू केली असून, तृणमूल सोडल्याचा राग काढत माझ्या सासू सासऱयांच्या घरातली वीजही त्यांनी तोडल्याचा आरोप, खान यांनी केला. यावेळी खान यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी व इद्रिस अली हे खान यांच्याकडे धावून गेल्याने प्रसंग हाणमारीपर्यंत जाण्याची चिन्हे होती. मात्र, त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले.



























































