मालवणातील विशेष महाशिबिरात 350 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना ‘ऑन दि स्पॉट’ दाखले लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे जनतेला गरजेचे आहे ते शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने मिळालेच पाहिजे. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले विशेष महाशिबीर  हे होय. लाभार्थी व नवे लाभार्थी यांना एकाच ठिकाणी दाखले उपलब्ध व्हावेत या सामाजिक भावनेतून अध्यक्ष मंदार केणी व सर्व सदस्यांनी तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या शिबिराला जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे शिबीर खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले, असे कौतुकाचे बोल आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे आयोजित विशेष महाशिबीर प्रसंगी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना मालवण समिती मार्फत जनतेसाठी विशेष महाशिबीर मालवण मामा वरेरकर नाट्यगृह येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आले. संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी लागणारे हयात व उत्पन्न दाखले एकाच वेळी मिळून त्याची तलाठी मार्फत लगेच चौकशी. नवीन लाभार्थी यांना एकाच ठिकाणी दाखले उपलब्ध व्हावेत. यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी या महाशिबिरात उपस्थित होते. लाभार्थी नोंदणी व दाखले प्रक्रिया विविध टेबल मांडणी करून सुलभ करण्यात आली. शिबिरात 350 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी उत्पन्न दाखले 156, हयातीचे दाखले 95, नवीन 70 प्रकरणे दाखल करत लाभार्थ्यांना विशेष महाशिबिराचा लाभ देण्यात आला.

लाभार्थी यांना सुलभ पद्धतीने एकाच ठिकाणी दाखले उपलब्ध व्हावेत. दाखले मिळवण्यासाठी गोरगरीब जनतेचे हेलपाटे वाचावेत, प्रवासाचा खर्च वेळ वाचवा. या भावनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे समिती अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले.

यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य लाभार्थ्यांना सेवा देत होते. समिती अध्यक्ष मंदार केणी, तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून शिबिरात मिळालेल्या तत्पर सेवेबाबत लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी हे यावेळी उपस्थित होते.

पुढिल महिन्यात रेशनकार्ड शिबिर

या शिबिराला जनतेचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता जनतेसाठी अश्या शिबिरांची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे स्पष्ट होते. याचा विचार करता. पुढील महिन्यात रेशनकार्ड बाबत एक शिबीर महसुल प्रशासनाने आयोजित करावे. रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी, नाव कमी करणे, नवे रेशनकार्ड याबाबत नागरिकांना लाभ घ्यावा. अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार अजय पाटणे यांना केली. या महाशिबिराचे सर्वांनीच कौतुक केले.