‘सेक्सटॉर्शन’द्वारे मोहोळच्या आमदारांना मागितली खंडणी, आरोपीला राजस्थानमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सऍप मेसेजसह कॉल करून ‘सेक्सटॉर्शन’द्वारे मोहोळच्या आमदारांना 1 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीखोराला पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली आहे. रिझवान अस्लम खान असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. आरोपीने अशाच पद्धतीने 80 जणांना व्हिडिओ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सायबर चोरटय़ाने तक्रारदार आमदारांकडे खंडणी मागत बदनामीचा प्रयत्न केला. याप्रकरणी सायबर पथकाने सात दिवस तपास करून आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. आरोपी खान याचा गुह्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून चार मोबाईल, सिमकार्ड जप्त केले आहेत. – रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे