अज्ञात वाहनाच्या धडकेत सीमा सुरक्षा दलाचा जवान ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । येवला

ठाणगाव-पाटोदा रोडवरील शिंदे ओहळ या ठिकाणी शुक्रवारी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सीमा सुरक्षा दलातील जवान सागर राणोबा खुरासने (28) हा जवान जागीच ठार झाला तर मोटरसायकलवरील त्यांचा त्रंबक राणोबा खुरासने व मुलगा आदित्य सागर खुरासने जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सागर हे गेल्या एक महिन्यापासून गावी सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून ते रात्री कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते. त्यासाठी ते किरकोळ सामान आणण्यासाठी पाटोदा येथे जात होते, मात्र काळाने अचानक त्यांच्यावर घाला घातल्याने असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मदत केली. याबाबत येथील नागरिकांनी येवला पोलिसांना या अपघाताबाबत माहिती देऊनही पोलीस सकाळपर्यंत घटनास्थळी हजर न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 6 एप्रिल दुपारी चार वाजता त्यांच्यावर ठाणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक एच. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. आर. जारवाल, पोलीस हवालदार मुकेश निकम हे करीत आहेत.