‘गुगल पे’ ऍप ठरतेय घातक, तीन मिनिटांत एक लाख रुपयांना चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायबर क्राइमसाठी लोकांनी नवनवीन प्रकार शोधून काढले आहेत. त्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातून मोठमोठ्या रकमा हातोहात काढून घेतल्या जाऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीतील नोएडा येथे एका महिलेबाबत घडली. गुगल सर्चवरून या महिलेने एका गुरुद्वारा येथे बुकिंग केले. हा नंबर तिला गुगलवरून मिळाला होता. तिला ‘गुगल पे’ यूपीआय ऍपवरून फॉर्मची फी 5 रुपये भरण्यास सांगण्यात आले. तिने ती भरताच केवळ तीनच मिनिटांत तिच्या खात्यातून 1 लाख रुपये काढून घेण्यात आले. यावरून ‘गुगल पे’ हे यूपीआय ऍप किती घातक ठरू लागले आहे याची प्रचीती येते.

या महिलेने गुगल पे ऍपवर 5 रुपये भरल्याचे सांगण्यासाठी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला तेव्हा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फोन चालू ठेवण्यास तिला सांगण्यात आले. त्याच दरम्यान या महिलेला चार-पाच एसएमएस आले. तिने गडबडीत फोन ठेवून मेसेज पाहिले. हे मेसेज बँकेकडून आले होते. तिच्या खात्यातून चार-पाचवेळा मिळून एक लाख रुपये काढण्यात आले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या महिलेने सायबर सेल आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.