
व्हॅनिटी व्हॅन निर्मितीच्या नावाखाली कॉमेडियन कपिल शर्माची 5.30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीसी डिझाईनच्या दिलीप छाब्रिया विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सीआययू करणार आहेत. नवीन गुन्हा दाखल झाल्याने छाब्रियाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
कॉमेडियन कपिल शर्माने मार्च 2017 ते मे 2017 या काळात नवीन व्हॅनिटी व्हॅन बनवण्यासाठी छाब्रियाला 5 कोटी 30 लाख रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर मे 2018 मध्ये जीएसटी लागू झाल्यावर छाब्रियाने कपिलकडून आणखी 40 लाख रुपये मागितले. पैसे देऊनही व्हॅनिटी व्हॅन न बनवल्याने त्याच्यात वाद झाल्यावर कपिलने 2019 मध्ये राष्ट्रीय कंपनी लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने त्याची दखल घेत डीसी डिझाईनची सहा बँक खाती गोठवली होती. त्यानंतर छाब्रियाने व्हॅनिटी व्हॅनच्या पार्किंगच्या नावाखाली कपिलकडून आणखी 60 लाख रुपये मागितले होते.
फसवणूक केल्याप्रकरणी कपिल यांनी सप्टेंबर 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. आज छाब्रिया विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तो पुढील कारवाईसाठी सीआययूकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांची घेतली भेट
छाब्रियाने केलेल्या फसवणूकप्रकरणी कपिल शर्मा याने आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर सीआययूचे प्रभारी सचिन वाझे यांना भेटून फसवणुकीच्या प्रकराची माहिती दिली.
दिलीप छाब्रियाचे नाव वृत्तपत्रात आल्याचे समजताच आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो. छाब्रियाला व्हॅनिटी व्हॅनचे पूर्ण पैसे देऊन त्याने व्हॅन दिलेली नाही. फसवणूक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. – कपिल शर्मा


























































