
दम लागत असल्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कुंभारमाठ येथील एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान त्या रुग्णाची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली असता तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. रुग्णाला अन्य आजार होता, त्यावरही उपचार सुरू होते, अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. सोमवारी इतर 7 व्यक्तींची कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मालवण तालुक्यातील कोरोनामुळे झालेला हा 21 वा मृत्यू आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण 579 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 536 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 22 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
























































