ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी, बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्यावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन वर्गात उपस्थित राहणाऱया विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. गोदरेज इंटेरिओने केलेल्या सर्वेक्षणात 22 टक्के विद्यार्थी हे गादीवर, तर 14 टक्के विद्यार्थी जमिनीवर बसून ऑनलाइन वर्गाला हजेरी लावतात. विद्यार्थ्यांची बसण्याची पद्धत चुकीची असल्याचे मत शिक्षण तज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘घरून शिक्षण घेत असताना मुलांनी घ्यायची काळजी’ या विषयावर गोदरेज इंटेरिओ आणि एरगॉनॉमिक्स रिसर्च सेल यांनी अभ्यास केला. त्यासाठी देशातील 3-15 या वयोगटातील 350 शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद व्हायच्या आधीच्या काळापेक्षा 2-3 तास जास्त म्हणजेच दिवसाला साधारण कमीत कमी 4-6 तास मुले गॅझेटवर असतात असे या संशोधनात सहभागी झालेल्या पालकांनी सांगितले. या वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या शारीरिक आरोग्याचा धोका वाढला आहे. या अभ्यासातून हेही उघड झाले आहे की, 52 टक्के विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाइन वर्ग असतात, तर 36टक्के मुलांचे ऑनलाइन वर्ग आठवडय़ात चारवेळा असतात आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की, 41 टक्के मुलांनी डोळ्यांवर ताण येत असल्याच्या तक्रारी केल्या.

गोदरेज इंटेरियोने आयोजित केलेल्या चर्चासत्रात 1700 हून अधिक जण सहभागी झाले. यावेळी शिक्षण तज्ञ आणि आरोग्य सेवा तज्ञांकडून या काळातील आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेबिनारचे आयोजन जागरण एज्युकेशन फाऊंडेशनचे सीडीओ लेफ्टनंट कर्नल ए. शेखर यांनी केले. पॅनेलमध्ये डीपीएस नाशिक, वाराणसी आणि लावा नागपूरचे संचालक सिद्धार्थ राजगऱिहया, कोर्रेबोरीच्या सहसंस्थापक लीना अक्षर, बालमानसतज्ञ चांदनी भगत, आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक फातिमा आगरकर आणि गोदरेज इंटेरिओच्या वर्कप्लेस आणि कार्याभ्यास संशोधन विभागाच्या मुख्य अभ्यासक डॉ.रीना वालेचा यांचा समावेश होता.

तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या भावनिक आरोग्याची गुणवत्ता सुधारणे वा कमी करणे; शिक्षण, प्रेरणा मिळावी असा कशासाठी करायचा याचा पर्याय आपल्याकडे असतो. आपण या गोष्टीकडे ज्या पद्धतीने बघू त्यावरून आपण त्याचा वापर कसा करणार आणि त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होणार हे ठरत असते. आपल्या मुलांसाठी योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रबोधन करणारे गोदरेज इंटेरिओच्या ‘टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन अॅज दे लर्न फ्रॉम होम’ यासारखे वेबिनार ही खूप महत्त्वाची साधने आहेत.