
जस्ट डायलच्या वेबसाइटवर नोंदणी करून फसवणूक करणाऱया झारखंडच्या जामतारा गँगच्या एकाला मालाड पोलिसानी अटक केली. मोहम्मद उस्मान असे त्याचे नाव आहे. त्याचे बँक खाते पोलिसांनी गोठवले आहे.
तक्रारदार हे भाईंदर येथे राहतात. त्यांचे एक हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलला झोमॅटोच्या माध्यमातून जेवण्याच्या ऑर्डर हव्या होत्या. सप्टेंबर महिन्यात तक्रारदारांना मोबाईलवर फोन आला. आपण झोमॅटो कंपनीच्या मुंबई विभागाचा मॅनेजर बोलत आहोत असे भासवले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करून गुगल पे ऍपवरून 20 रुपये पाठवण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी स्वतःची आणि बँक खात्याची माहिती भरली. बँक खात्याची माहिती भरल्यावर तक्रारदाराना एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आला. ओटीपी सांगितल्यावर तक्रारदार तो शेअर करणार नाहीत. म्हणून तक्रादारांना फ्रेंचायझीसाठी आलेला पिननंबरच्या भूलथापा मारून ओटीपी घेतला. ओटीपी मिळताच तक्रारदाराच्या बँक खात्यातील 98 हजार 965 रुपयांवर डल्ला मारला.
फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, पोलीस हवालदार अशोक कोंडे, विकास म्हस्के यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी ज्या खात्यात पैसे जमा झालेले ते बँक खाते गोठवले. जेथून तक्रारदारांना फोन आला त्याची माहिती काढली. तो फोन झारखंड येथून आला होता. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून मोहम्मदची माहिती काढली. तो नवी मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी मोहम्मदला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बांधकाम मजूर ते जामतारा गँग
बांधकाम मजूर असलेला उस्मान हा लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर तो झारखंडला गेला. पैशाची गरज असल्याने तो जामतारा गँगच्या संपर्कात आला. फसवणुकीसाठी मोहम्मदचे इतर साथीदार फोन करत असायचे. तर फसवणुकीतून आलेल्या रकमेसाठी मोहम्मदने स्वतःच्या बँक खात्याचा वापर केला. पोलिसांनी मोहम्मदचा एक मोबाईल जप्त केला आहे. मोहम्मद आणि त्याचा साथीदार इसराइल अन्सारीने मिळून अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले.






























































