ऑनलाइन मैत्री महागात पडली, लग्नाचे खोटे आमिष दाखवून 65 लाखांना गंडा

ऑनलाइन मैत्री करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. मीरा रोडमध्ये राहणाऱ्या या तरुणीला भामट्याने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 65 लाखांचा गंडा घातला आहे. चेतन शर्मा (25) असे भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी चेतन व त्याच्या आईवडिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबमधील पठाणकोट अब्रोलनगर परिसरात राहणाऱ्या चेतन शर्मा याने ऑक्टोबर 2023 मध्ये मीरा रोडमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीचा विश्वास संपादित केल्यानंतर या भामट्याने तिला लग्नासाठी मागणी घालून साखरपुडा केला. त्यानंतर तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. या काळात त्याने तरुणीकडून नोकरीचे कारण व विविध कारणे सांगून 65 लाख 30 हजारांची फसवणूक केली.

भामट्यासह आईवडिलांवर गुन्हा

साखरपुडा होऊन अनेक महिने उलटले तरी चेतन लग्न करत नसल्याने तरुणीला संशय आला. तिने लग्नासाठी तगादा लावला असता या भामट्याने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तिने चेतनच्या आईवडिलांसोबत संपर्क केला असता त्यांनीही तिला शिवीगाळ केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेत चेतन व त्याच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.