
खासगी कंपन्यांकडून विक्री होणारी ऑनलाइन तसेच पेपर लॉटरी खरी की खोटी, असा प्रश्न उपस्थित झाला असून ग्राहकांनी शहानिशा करूनच लॉटरीची खरेदी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याचे लॉटरी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन सातार्डेकर यांनी बनावट पेपर लॉटरींचा पुराव्यांसह पर्दाफाश केला. दिवाळी सोडतींचा जणू महापूरच लॉटरी स्टॉलवर तसेच ऑनलाइनवर सुरू झाला आहे. ग्राहक हे आशेपोटी आकृष्ट होताना दिसतात, पण या साऱ्या लॉटरी अधिकृत, पारदर्शक व सरकारमान्य आहेत काय, हे आधी तपासून घेण्याची गरज आहे. ग्राहक, विक्रेते तसेच वितरक यांनी दक्षता घेण्याची वेळ आली असून लॉटरी विभाग, गृह खाते यांनी अशा लॉटरींबद्दल खबरदारी घेतली पाहिजे, असे सातार्डेकर यांनी काही उदाहरणांसह नजरेस आणून दिले. या वेळी लॉटरी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी संजय शेट्ये, विनोद गाडेकर, दशरथ राऊळ, अशोक नलावडे, संजय नारिंग्रेकर उपस्थित होते.




























































