अंधेरीत पेट्रोलपंपावर गोळीबार

549

अंधेरीच्या चकाला येथील पेट्रोलपंपावर मोटारसायकलवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चकाला येथे असलेल्या गुरुनानक पेट्रोलपंपावर बुधवारी पहाटे एक कर्मचारी काम करत होता. तेव्हा चेहऱयाला रुमाल बांधलेले दोघेजण मोटारसायकलवरून आले व मोटारसायकलवर बसलेल्या एकाने पेट्रोलपंपावरील कर्मचाऱयाला येथे कितीजण काम करतात असे विचारले. तेव्हा कर्मचाऱयाने 7-8 जण काम करतात असे सांगितले. त्याचदरम्यान मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकाने पिस्तूल काढली. पिस्तूल पाहताच कर्मचारी पळू लागला. त्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी एका टेबलाला लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. कर्मचाऱयाने आरडाओरड केल्यावर अन्य कर्मचारी तेथे आले. गोळीबाराच्या घटनेची माहिती अंधेरी पोलिसांना कळवण्यात आल्यावर काही वेळातच अंधेरी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पोलीस पाहणी करत आहेत. नेमका गोळीबाराचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. याचा तपास अंधेरी आणि गुन्हे शाखेचे युनिट- 10 करत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या