
बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी 1डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आले. त्यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने चांगली कामगिरी बजावली आहे. या महिन्याभराच्या काळात 85 मुले,महिला आणि पुरुष यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहिमेतील या यशाबद्दल आयपीएस आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना गौरविण्यात आले.
‘ऑपरेशन मुस्कान’ मध्ये महिला आणि मुले यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. नगर जिल्ह्यामध्ये हरवलेल्या महिला, पुरुष आणि अपहरन केलेली किंवा बेपत्ता झालेली मुले यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. ‘ऑपरेशन मुस्कान’ दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये 10 लहान मुलांच्या अपहरणांचे गुन्हे दाखल असून त्यापैकी 4 बालकांचा शोध घेण्यात आला आहे.त्याचबरोबर 137 व्यक्ती हरवल्या होत्या. त्यापैकी 81 जणांचा शोध घेण्यात आला आहे. 78 महिलांपैकी 52 तर 59 पुरुषांपैकी 29 जणांचा शोध घेण्यात आला आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 85 बालके ,महिला, पुरुष यांचा शोध घेण्यात आला आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपुर,) श्रीमती दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आयपीएस आयुष नोपाणी,पोलिस सबइन्स्पेक्टर समाधान सुरवाडे,पोलीस नाईक संजय दुधाडे, पोलीस नाईक दत्तात्रय दिघे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राधा टोपे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोकळ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बारसे यांना गौरविण्यात आले आहे.
























































