
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हिंदुस्थानने एअर स्ट्राइक करून अवघ्या 25 मिनिटात नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र डागत जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर बिथरलेला पाकिस्तान काही तरी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात घेत हिंदुस्थानचं सैन्य सतर्क होतं. अंदाजानुसार पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागण्याचा आणि हिंदुस्थानचे रडार निकामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सक्षम हिंदुस्थानी रडार यंत्रणनेने सारे क्षेपणास्त्र निकामे केले. त्यानंतर चोख प्रत्त्युत्तर देत लाहोरमधील रडार यंत्रणा नेस्तनाबूत केली.
हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये ‘7-8 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानच्या काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींनी (रडार) त्यांना निष्क्रिय केले. या हल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत. हे अवशेष म्हणजे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत’अशी माहिती देण्यात आली .
आज सकाळी हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. हिंदुस्थानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली म्हणजेच रडार निष्क्रिय करण्यात आल्याचे विश्वसनीयरित्या कळल्याचे यात सांगण्यात आले आहे.