Operation Sindoor – हिंदुस्थानच्या कारवाईत क्रूरकर्मा मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू, ढसाढसा रडला!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून हिंदुस्थानी सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. हिंदुस्थानी सैन्याने कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर क्रूरकर्मा मसूद अजहरने नक्राश्रू काढले आहेत. मसूद अजहर ढसाढसा रडला असे म्हटले जात आहे. हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरे झाले असते, असे मसूद अजहरने एक पत्रक जारी करत म्हटले आहे.

LIVE अपडेट Operation Sindoor: हिंदुस्थानी सैन्याच्या कारवाईत 80 हून अधिक दहशतवादी ठार

हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यात बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरची बहीणही ठार झाली आहे. या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईकही मारले गेले. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. पंजाबमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणी हल्ले केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू, तीस जखमी, मृतांमध्ये मुलांचाही समावेश

जैश-ए-मोहम्मदने एक निवेदन जारी केले आहे. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. मुफ्ती अब्दुल रौफ यांचे कुटुंबीयही ठार झाले आहेत. त्यांना आजच दफन करण्यात येईल, असे जैशने म्हटले आहे. हल्ल्यात अजहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारीही मारले गेले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमधील सुभान अल्लाह कंपाऊंडवरही हल्ला करण्यात आला.