श्री विठ्ठल-रूक्मिणीची तुळशीपुजा करण्याची भाविकांना संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यापासून भाविकांसाठी बंद असणारी देवाची तुळशीपूजा चैत्र पाडव्यापासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली. भक्त निवास येथे मंदिर समितीची बैठक झाली. त्यानंतर औसेकर महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीस मंदिर समिती सदस्य शिवाजी महाराज मोरे, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात आले. त्यावेळी मंदिरातील परंपरागत बडवे-उत्पात-सेवाधारी यांच्याकडून भाविकांच्या हस्ते विविध पूजा केल्या जात होत्या. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून सदर पूजा बंद होत्या. यापैकी काही पूजा पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांमधून होत होती. या मागणीचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये श्री विठ्ठलाची तुळशीपूजा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चैत्र पाडव्यापासून तुळशीपूजा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी यासाठी आकारण्यात येणाऱया देणगीबाबत अद्यापि निर्णय झाला नसल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या सुरू असलेल्या नित्यपूजा, पाद्यपूजा करण्यासाठी काही दिवस आधी नोंदणी करावी लागते. मात्र, तुळशीपूजा ही दर्शनासाठी आलेला भाविक कधीही करू शकतो. सभामंडपात विष्णुसहस्त्र्ानामाचे पठण करून तुळशीपूजा केली जाणार आहे.

मंदिराच्या आराखडय़ासाठी 73 कोटी रुपये मंजूर असून, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक होणार आहे. प्रदक्षिणा मार्ग तसेच चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्याचा सव्वा कोटींचा ठेका देण्यात आला आहे. स्वच्छतेचे काम मंदिर समितीमार्फतच केल्यास लाखो रुपयांची बचत होणार असल्याने याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सांगितले.

लाडूचा ठेका होणार रद्द ?
मंदिर समितीच्या वतीने भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू दिला जातो. याला भाविकांमधून मोठी मागणी असूनदेखील संबंधित ठेकेदाराकडून याचा कमी पुरवठा होतो. तसेच, काही दिवसांपूर्वी मंदिर समितीने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा लाडूचे वजन कमी असल्याचे आढळले आहे. या शिवाय पिशव्यांचा पुरवठा न करणे, लाडूच्या दर्जाबाबतही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सदर ठेकेदारास ‘लाडूचा ठेका रद्द का केला जाऊ नये’, या आशयाची नोटीस देण्यात आल्याची माहिती तुषार ठोंबरे यांनी दिली. मंदिर समितीच्या सदस्यांनी सदर ठेका रद्द करावा, अशी मागणी केली असून, पूर्वीप्रमाणे मंदिर समितीच बुंदीचा लाडू तयार करून विक्री करणार आहे.