
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी 15 प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक अडीच तास चालली. ही बैठक शरद पवार यांनी बोलावली नव्हती. ही बैठक ‘राष्ट्रमंच’चे नेते यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. काँग्रेसला डावलून बैठक घेण्यात आली नाही. काँग्रेसला वगळण्याचा कोणताही इरादा नाही, असे राष्ट्रवादीचे नेते माजिद मेनन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला सक्षम राष्ट्रीय पर्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6, जनपथ या निवासस्थानी प्रमुख पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची चर्चा गेली दोन दिवस राजकीय वर्तुळात सुरू होती. 6, जनपथबाहेर मीडियाने मोठी गर्दी केली होती. अडीच तास ही बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते माजिद मेनन आणि समाजादी पक्षाचे नेते घनशाम तिवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पर्यायी व्हीजन देण्याचा प्रयत्न
देशातील कोरोनाचे संकट, अर्थव्यवस्थेची खालावलेली स्थिती, शेतकरी विरोधी कायदे, बेरोजगारी, सामाजिक ऐक्याला तडे आदी विविध मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय वातावरण सुधारण्यासाठी ‘राष्ट्रमंच’ काय योगदान देऊ शकते? जनतेच्या समस्या कशा सोडाविल्या जातील त्यासाठी अल्टरनेट व्हीजन (पर्यायी दृष्टी) काय देता येईल यावर चर्चा झाली. विविध तज्ञांनी यावर मते मांडली, असे घनशाम तिवारी यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांना बोलाविले होते
- माजिद मेनन म्हणाले, गेल्या 24 तासांपासून काही माध्यमांकडून ‘राष्ट्रमंच’ची बैठक भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवार यांनी बोलावली असे वृत्त दिले जात आहे. मात्र असे काहीच नाही. ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली; पण ही बैठक शरद पवारांनी बोलावली नव्हती. ‘राष्ट्रमंच’चे नेते यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. जे राष्ट्रमंचचे सदस्य आहेत ते उपस्थित होते. राजकीय नेत्यांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरही हजर होते. देशासमोरील विविध समस्यांवर विचार विनिमय झाला.
- काँग्रेसला वगळण्याचा कोणताही इरादा नसल्याचा खुलासाही माजिद मेनन यांनी केला. काँग्रेस नेत्यांनाही बैठकीचे निमंत्रण दिले होते. यामध्ये कपिल सिब्बल, मनिष तिवारी, अभिषेक मनु सिंघवी, शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. पण काहीजणांना खरोखर अडचण होती. काही नेते दिल्लीबाहेर होते. त्यामुळे काँग्रेसला एकटं पाडण्यासाठी आघाडी होत आहे अशी चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे, असे मेनन यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची कार्यकारणी बैठक
‘राष्ट्रमंच’ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रमुख नेते हजर होते.
प्रमुख नेते आणि मान्यवर उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘राष्ट्रमंच’चे नेते यशवंत सिन्हा, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, राष्ट्रीय लोकदलचे जयंत चौधरी, जनता दलाचे माजी नेते पवन वर्मा, भाकपचे बिनॉय व्हिसम, माकपचे निलोत्पल बसू तसेच संजय झा उपस्थित होते. मान्यवरांमध्ये माजी न्यायमूर्ती ए. पी. शहा, जावेद अख्तर, के. सी. सिंह उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे नेते आणि द्रमुक नेते अनुपस्थित होते.
























































