
नितीशकुमार हे दुपारी 12.30 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. दुपारी 1 वाजता ते ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील, असे सांगण्यात आले.
भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची भक्कम एकजूट उभारली जात असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार हे गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नितीशकुमार उद्या मुंबई दौऱ्यावर येत असून ते या दौऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हेसुद्धा असणार आहेत.
देशात भाजपचा हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दडपशाही केली जात आहे. विरोधी पक्षनेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर हे सगळे चालले असून त्याला लगाम लावण्यासाठी विरोधकांची एकजूट उभी राहत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे भक्कम असा पर्याय उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.
प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी
राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या एकजुटीसाठी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी पुढाकार घेतला आहे. याआधी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचीही या दोन नेत्यांनी भेट घेतली. मंगळवारीच नितीशकुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेऊन चर्चा केली.






























































