
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने चाहत्यांना ईदनिमित्त खास मेजवानी दिली आहे. त्याने रिऑलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला प्रोमो वूटवर सादर केला आहे. बिग बॉसचा 15वा सिजन 8 ऑगस्टपासून वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे, त्यानंतर सहा आठवडय़ांनी म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
30 सेकंदांचा प्रोमो शेअर करत सलमान खान म्हणाला, ‘‘आतापर्यंतचा हा सगळ्यात सेंसेशनल सिजन ठरणार आहे. इतका व्रेझी असणार की टीव्हीवर बॅन होऊन जाईल. या शोमध्ये जनता फॅक्टर सगळ्यात आधी आणि लोकांच्या हातात पॉवर असणार. शोमध्ये ड्रामा, एंटरटेनमेंट आणि इमोशन हे सारं काही असणार. शोकडून तुम्हाला वचन देतो!. आता हे किती खरंय हे तुम्हाला शो सुरू झाल्यावर कळेलच’’. टीव्हीच्या आधी ओटीटीवर एपिसोड दिसणार असल्याने चाहते कधीही, कुठेही एपिसोड पाहू शकणार आहेत. यंदा नक्की कोणते सेलिब्रेटी ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणार यावरचा पडदा लवकरच हटणार आहे.






























































