आमची लढाई भाजप आणि शिंदे गटाविरोधात नवाब मलिक यांचा दावा

‘मुंबई महापालिका निवडणुकीत आमची लढाई भाजप व शिंदे गटाच्या विरोधात आहे. निकाल लागल्यावर ते स्पष्ट होईल. आम्ही या दोन्ही पक्षांचा अनेक जागांवर पराभव करू,’ असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

अजित पवारांचा गट मुंबईत 97 जागांवर निवडणूक लढत आहे. मात्र हा पक्ष अल्पसंख्याकांची मते वळवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप नवाब मलिक यांनी फेटाळला आहे. ‘अल्पसंख्याक बहुल असलेल्या अनेक वॉर्डांत आम्ही निवडणूक लढवत नाही आहोत. अल्पसंख्याकांची 90 टक्के मते असलेल्या शिवाजी नगरमधील तीन वॉर्डमध्ये आम्ही उमेदवार दिलेले नाहीत. मदनपुऱ्यात उमेदवार दिलेला नाही. भेंडीबाजार, मालवणीत आम्ही रिंगणात नाही. त्यामुळे मते फोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यातील काही जागा आम्ही यावेळी जिंकणार आहोत. काही जागा काँग्रेसच्या जिंकणार आहोत,’ असे मलिक म्हणाले.

 समाजवादी, एमआयएमला दोनतीन जागा मिळतील!

‘आमचा सामना समाजवादी पक्ष किंवा एमआयएमशी नाही. त्यांच्या विरोधात अनेक जागांवर आम्ही उमेदवारच दिलेले नाहीत. त्या पक्षांना मुंबईत फारतर दोन-तीन जागा मिळतील. आमची खरी लढाई भाजप आणि शिंदेंविरोधात आहे,’ असे मलिक म्हणाले.