भरधाव कार झाडला धडकून तिघे जखमी, पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचा ताबा सुटून भरधाव मारुती अल्टो कार झाडावर धडकून तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील प्यूअर बेरी फॅक्टरीसमोर शनिवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली आहे. जखमींवर सातारा येथे उपचार सुरू आहेत.

शुभम सुभाष फळणे (25), नयन सुनंदा सपकाळ (24), शेखर कुरुंदे (वय 24, सर्व रा. महाबळेश्वर अशी जखमींची नावे आहेत. वरील तिघे आपल्या अल्टो कारमधून पाचगणीवरून महाबळेश्वरला जात होते. प्यूअर बेरी फॅक्टरीसमोर कार आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की गाडी झाडावर आदळल्यानंतर ती पुन्हा पाचागणीच्या दिशेने फिरली. गाडीतील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पाचगणी येथील ‘येस ओ येस’ टीमचे सदस्य मेहुल पुरोहित, निहाल बागवान, सुनील उंबरकर, सचिन वाडकर, अजित कासूरडे, किरण जानकर, दोराब दुबाश यांनी घटनास्थळी येत जखमींना कटरने दरवाजा कापून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून सातारा येथे उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.