पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन, वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saalumarada Thimmakka

प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. इंग्रजी संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या आणि बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

३० जून १९११ रोजी तुमकूरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. ग्रामीण कर्नाटकात अनेक दशके केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

बेंगळुरू दक्षिणमधील रामनगर जिल्ह्यातील हुलिकल आणि कुडूर दरम्यानच्या ४.५ किमीच्या पट्ट्यात त्यांनी ३८५ वडाची झाडे लावल्यामुळे त्यांना ‘सालूमरदा’ (झाडांची रांग) हे नाव मिळाले.

औपचारिक शिक्षण नसलेल्या आणि मूलबाळ नसलेल्या थिमक्का यांनी आपल्या वैयक्तिक पोकळी भरून काढण्यासाठी रोपे लावण्यास सुरुवात केली आणि त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले. त्यांचे हे कार्य कालांतराने तळागाळातील पर्यावरण संवर्धनासाठी एक मापदंड ठरले आणि त्या शाश्वत जीवनाचे प्रतीक बनल्या.

आजवर त्यांना १२ मोठे सन्मान मिळाले, ज्यात २०१९ मध्ये पद्मश्री, हम्पी विद्यापीठाकडून नडोजा पुरस्कार (२०१०), राष्ट्रीय नागरिक पुरस्कार (१९९५) आणि इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार (१९९७) यांचा समावेश आहे. त्यांच्या योगदानाबद्दल सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रांतही त्यांचा मोठ्या प्रमाणावर आदर केला जात असे.

त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यात येत असून, थिमक्का यांना एक पायोनियर हरित योद्धा म्हणून आठवले जात आहे, ज्यांचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला, ते म्हणाले की, हजारो झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या ‘सालूमरदा तिम्मक्का’ यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. पर्यावरणावरील त्यांच्या प्रेमाने त्यांना ‘अमर’ केले आहे, आणि त्यांच्या जाण्याने राज्यात एक प्रकारची पोकळी झाली आहे. त्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना केली आणि कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली.