
श्रीलंकेनंतर आता पाकिस्तान आर्थिकदृष्टय़ा पुरता कंगाल झाला आहे. त्यामुळे लग्न समारंभावरील खर्चाला कात्री लावण्याचे आदेश शाहबाज सरकारने काढले आहेत. लग्नात पाहुण्यांना जेवणात एकच डिश द्यावी, रात्री उशीरापर्यंत वरात, मेहंदी, वलीमा, भांगडा पार्टी असे कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे.
पाकिस्तानमध्ये महागाई गणगणाला भिडली असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे. परिणामी शहाजबाज सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी आर्थिक उधळपट्टीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समारंभावरील खर्च कपातीचे निर्देश दिले आहेत.
वीज वाचवण्यासाठी धडपड
पाकिस्तानने वीज वाचवण्यासाठी मार्केट, शॉपिंग मॉल, हॉल, आणि दुकाने रात्री 9 पर्यंतच सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यातून औषधाची दुकाने, पेट्रोल पंप, बस टर्मिनल, दूधाची दुकाने सुरु ठेवण्याबाबत सुट दिली आहे. तसेच सरकारी कार्यालये आठवडय़ातून पाच दिवस सुरु ठेवली जाणार आहेत. तसेच रात्री नऊनंतर रहदारी नसलेल्या रस्त्यावरील दिवे बंद ठेवले जाणार आहेत. तसेच वर्क फ्रॉम होमचा पर्यायही कर्मचाऱयांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱयांना इंधनाच्या वापरात 40 टक्के बचत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लष्कर शुक्रवारी वाहने बंद ठेवून ड्राय डे पाळणार आहे.
























































