पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानावर हल्ला, 9 मुलांसह 10 जणांचा मृत्यू

terrorist

पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबता थांबायचे नाव घेत नाहीयत. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात नऊ मुलांसह दहा जण मारले गेले आहेत. अफगाणिस्तानच्या सरकारने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला मध्यरात्री झाला असून त्यात स्थानिक लोकांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सीमेवर तणाव पसरला आहे. तालिबानचे प्रवक्ते, जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी 12च्या सुमारास गुरबुज जिल्ह्याच्या मुगलगई परिसरात हा हल्ला करण्यात आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी लिहिले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी  लोकल नागरिक काजी मीर यांचा मुलगा वालियत खान यांच्या घरावर बॉम्ब फेकले त्यात 9 मुलांचा मृत्यू झाला. यापैकी पाच मुलं आणि चार मुलींचा समावेश आहे. त्यात एका महिलेचाही मृत्यू झाला आहे.

मुजाहिद यांनी सांगितले की, सोमवारी रात्री कुनार आणि पक्तिका प्रांतात वेगवेगळे हवाई हल्ले झाले, ज्यामध्ये चार सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर खोस्तमध्ये झालेला हल्ल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्यामध्ये काही काळ शांतता होती, मात्र आता पुन्हा तणाव वाढला आहे. याआधी 9 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने काबुल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिकामध्ये एअरस्टाईक केला होता. त्यानंतर अफगान तालिबाननेही त्याला जोरदार प्रतित्योत्तर दिले होते.