
हिंदुस्थानने क्षेपणास्त्र हल्ला केलाच नाही, आमचे सर्व हवाईतळ सुरक्षित असल्याचा कांगावा पाकिस्तानने चालवला होता. मात्र एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानने 9 आणि 10 मे रोजी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नूरखान एअरबेससह इतर हवाईतळांचे प्रचंड नुकसान झाल्याची स्पष्ट कबुली दिली. त्याच दिवशी रात्री अडीच वाजता लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी फोन करून ही माहिती दिल्याचेही शरीफ यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पित्त खवळलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला केला. हा हल्ला परतवून लावतानाच हिंदुस्थानने पाकिस्तानातील लष्करी हवाईतळांवर क्षेपणास्त्र डागले. हिंदुस्थानने या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची माहितीही दिली. मात्र पाकिस्तानने क्षेपणास्त्र हल्ला झालाच नाही असे तुणतुणे वाजवले. लष्करी जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानने 9 आणि 10 मे रोजी आपल्या हवाईतळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता, अशी स्पष्ट कबुली दिली. हल्ला झाला त्यानंतर तासाभरात रात्री अडीच वाजता लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी फोन करून आपल्याला माहिती दिली होती असेही शरीफ म्हणाले.
चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही देश वाचवला
हिंदुस्थानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा आम्ही चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने मुकाबला केला. स्वदेशी तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून आम्ही देश वाचवला अशी मखलाशीही शाहबाज शरीफ यांनी केली.