
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानी उच्चायुक्तांना एका अहवालाद्वारे पीओकेमधील जैश-ए-मोहम्मदच्या 22 दहशतवादी ठिकाणांची माहिती देत यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु पाकिस्तानने नकारघंटा कायम ठेवत या 22 ठिकाणांवर दहशतवादी तळ नसल्याचे म्हटले आहे. याआधी पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याप्रकरणी कारवाईसाठी आणखी पुरावे देण्याची मागणी केली होती.
पुलवामा हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले होते. यानंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरोधातील पुरावे आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती दिली होती. हिंदुस्थानने एकूण 22 ठिकाणांची माहिती दिली होती. शुक्रवारी पाकिस्तानच्यावतीने याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली. यामध्ये पाकिस्तानने हिंदुस्थानने दिलेल्या माहितीची आम्ही प्राथमिक चौकशी केल्याचे म्हटले. ज्या 22 जागांवर दहशतवादी तळ असल्याचे हिंदुस्थानने म्हटले होते, तेथे कोणतेत दहशतवादी तळ नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तसेच मागणी केल्यास हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येईल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यामध्ये हिंदुस्थानचे 40 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते व पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी झाली होती. हल्ल्याच्या 12 व्या दिवशी मध्यरात्री हिंदुस्थानच्या वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील जैशचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानने 27 फेब्रुवारीला जैशच्या अन्य तळांची माहिती, तसेच आदिल दार आणि जैशच्या हल्ल्यासंबंधीचे व्हिडीओ पाकिस्तानकडे सुपुर्द केले होते, तसेच ज्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम नंबरवरून हे व्हिडीओ व्हायरल झाले त्याची माहिती देखील पाकिस्तानला दिली होती.
हिंदुस्थानने दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तसेच 54 जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, परंतु चौकशीमध्ये त्यांचा या हल्ल्यामध्ये किंवा दहशतवादी संघटनेशी कोणताही संबंध असल्याचे दिसून आले नाही. सध्या या सर्वांची आणखी चौकशी करण्यात येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
























































