
सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद
जम्मू आणि कश्मिरात पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदने दहशतवादी हल्ला केल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे पाकड्यांकडून दहशतवादविरोधात कारवाई करण्याची नौटंकी सुरू आहे. देशातील 182 मदरसे ताब्यात घेतल्याचे इम्रान खान सरकारने आज सांगितले. दहशतवादी गटांविरोधात कारवाई करताना सरकारने देशभरातून 121 जणांना अटक केल्याचा दावा केला आहे.
दोन दिवसांपूर्वी इम्रान खान सरकारने असेच कारवाईचे नाटक केले होते. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि मुलासह 44 जणांना अटक केल्याचे सांगितले होते. पुन्हा आता जगाला दाखविण्यासाठी कारवाईचे नाटक केले आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दीर्घकाळच्या नियोजनांतर्गत दहशतवादविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तान आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांवर कारवाई करू शकत नाही, या हिंदुस्थानच्या आरोपामुळे ही कारवाई झाली नसल्याचा खुलासा सरकारने केला आहे.

























































