
सामना प्रतिनिधी । पालघर
पालघरच्या वडराई समुद्रात मच्छीमारांनी एका महाकाय ‘व्हेल शार्क’ माशाला जीवदान दिले. वडराई येथील हितेंद्र मेहेर हे मंगळवारी मासेमारीसाठी समुद्रात गेले असता त्यांच्या जाळ्यात जवळपास 30 फुटांचा महाकाय ‘व्हेल शार्क’ मासा अडकला. आपल्या जाळ्यात महाकाय मासा अडकला असून तो सुटकेसाठी धडपडत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात येताच त्यांनी बोटीतील अवजारांच्या सहाय्याने जाळे कापून माशाची सुखरुप सुटका केली.
वडराईच्या समुद्रात हितेंद्र मेहेर हे त्यांच्या ‘अमर साई’ बोटीने मासेमारीसाठी समुद्रात 12 नॉटिकल मैलावर गेले होते. त्यांनी टाकलेल्या जाळ्यात हा व्हेल शार्क अडकला होता. यावेळी माशाच्या सुटकेसाठी त्यांनी जाळे कापून स्वत:चे नुकसान करत माशाला जीवदान दिले. त्यामुळे मेहेर व त्यांच्या सहकारी कोळी बांधवांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
शार्क मासा हा अत्यंत धोकादायक म्हणून ओळखला जोतो. मात्र याच प्रजातीमधील ‘व्हेल शार्क’ मासा हा आकाराने मोठा असून शांत स्वभावाचा असतो. शार्क प्रमाणे तो कुणावर हल्ला करत नाही. ‘व्हेल शार्क’ हा मासा प्रवाहातील पाणी पिऊन त्यासोबत आलेले करंदी, मांदेली असे छोटे मासे खाऊन जगतो. समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्यात या माशाचा मोठा वाटा अल्याचे मानले जाते.



























































