
काही वर्षांपूर्वी एका चित्रपटात लग्नाचे वऱ्हाडी भाड्याने मिळत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. तरुण मुला-मुलींना पैसे देऊन लग्नात नातेवाईक म्हणून बोलवत असल्याची दृश्य त्यात होती. चित्रपटातला तो प्रसंग खरोखर घडला तर?
ऐकायला खोटं वाटेल पण हरयाणात खरोखर एका दुकानात वऱ्हाडी भाड्याने मिळण्याची जाहिरात लावण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, हरयाणाच्या अंबाला कँट परिसरात एक पानाची टपरी आहे. श्री बिहारी लाल जी पानवाले या नावाने ही टपरी इथे प्रसिद्ध आहे. पण, इथे पानासोबत अजूनही एक गोष्ट मिळते.
या दुकानात लग्नासाठी वऱ्हाडी भाड्याने मिळतात. दुकानदाराने चक्क पानटपरीच्या बाहेरच एक बोर्ड लटकावला आहे. त्यावर आमच्याकडे आता देखील वऱ्हाडी भाड्याने मिळतील असं लिहिलं आहे.
या दुकानाचे मालक सनी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुकाना हरतऱ्हेचे वऱ्हाडी मिळतात. घोडीच्या समोर नाचणारे, घोडीच्या पाठी चालणारे, दारुडे, खवय्ये, मामा, काका, आजोबा, काकी यांच्यासमवेत सगळ्या प्रकारची नाती असलेले लोक मिळतात.
सनी यांच्या दुकानात फक्त आधारकार्ड दाखवून कुणीही वऱ्हाडी बनू शकतं. ते लग्नात जाऊन मिरवून परत येऊ शकतात. सनी यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता. दरवर्षी त्यांना अशा पाच ते सहा ऑर्डर्स मिळतात, असं सनी यांचं म्हणणं आहे.
























































