‘त्या’ परप्रांतीयांची हुतात्मा स्मारकाच्या परिसरातून पोलिसांनी केली हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्याची राजधानी पणजीमधील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाच्या सभोवती मुक्काम ठोकून स्मारकाचे पावित्र्य भंग करणाऱ्या परप्रांतीयांची पणजी पोलिसांनी हकालपट्टी केली आहे. ‘दैनिक सामना’ने हा विषय उपस्थित केला होता. पणजीचे पोलिस निरीक्षक सुदेश नाईक म्हणाले, रविवारी रात्री पोलिसांना पाठवून तेथील लोकांना हटवले होते. सोमवारी सकाळीही पोलिसांनी कारवाई करत तेथे झोपलेल्या लोकांना हटवले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून दरम्यानच्या काळात पोलिस नियमितपणे आझाद मैदानावर जाऊन तेथे लक्ष ठेवणार आहेत.

आझाद मैदानावर वर्ष भर अनेक कार्यक्रम होत असतात.लोकांची नेहमी ये-जा सुरु असते. तरीही परप्रांतीय निवांतपणे या स्मारकाच्या चारही बाजूला झोपलेली असतात. ही मंडळी कुठून आली,काय करतात याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे रविवारी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी 8 ते 10 जण या स्मारकाच्या आजूबाजूला झोपलेले होते. पुठ्ठे आणि बॅनर अंथरुन ही मंडळी आरामात झोपलेली असतात. स्मारकाच्या आजुबाजूला सिगारेट,चिप्सची पाकिटे, जेवणाच्या पिशव्या, पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या सगळीकडे दिसून येत आहेत.

मैदानावर असलेल्या सुलभ शौचालयामुळे या फुकटयांची सोय झाली आहे. झोपून उठल्यानंतर आंघोळ करून, कपडे धुवून ते तेथील झाडाच्या फांद्यांवर वाळत घालतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छ्ता पसरत आहे. मुरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ यादव यांनी रविवारी स्मारकाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि पणजी पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

आझाद मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
आझाद मैदानावर बऱ्याचदा कचरा पहायला मिळतो.दारूच्या बाटल्या,सिगरेट्सची पाकिटे ही नियमित बाब बनली आहे. मैदानवरील स्मारकाप्रमाणे मैदानाच्या कंपाउंडसाठी बांधलेल्या कठड्यावरही काही मंडळी झोपून असतात.त्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा रक्षक नसल्याने सगळे प्रश्न निर्माण होत असल्याचे महापौर उदय मडकईकर म्हणाले. जीएसआयडीसीने मैदानाचे सुशोभीकरण केल्यानंतर कंपाउंडवर असलेले ग्रिल्स काढून टाकल्याने कोणीही सहज आत येत असल्याचे महापौर मडकईकर यांचे म्हणणे आहे. आझाद मैदानात घातलेल्या लाद्या पावसामुळे गुळगुळीत झाल्या आहेत.त्यावरून चालणे धोकादायक आहे. पावसात या लाद्यांची आणि फुटपाथची सफाई करून ते चालण्यास सुरक्षित बनवावे अशी मागणीही करण्यात आली आहे.