
सामना ऑनलाईन, रायपूर
छत्तीसगडमधील जशपूर भागात एक भयंकर धक्कादायक प्रकार घडला आहे. इथल्या पंचायतीने बलात्काऱ्यांना दहा हजारांचा दंड ठोठावून सोडून दिलं. ही रक्कम मिळताच या पंचांनी अख्ख्या गावाला मटणाचं जेवण खाऊ घातलं आणि हे प्रकरण इथेच मिटलं असं जाहीर केलं. या गावातील तिघींवर बलात्कार झाला असून यातील दोघीजणी अल्पवयीन आहेत. ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो त्यांनी थट्टा मांडल्याने आपण आता पोलिसांकडे मदत मागणार असल्याचं पिडीतेच्या पालकांनी म्हटलं आहे.
५ जुलैला या तिघींवर बलात्कार झाला होता. पिडीत मुलींच्या पालकांनी पोलिसांत धाव घेण्याचं ठरवल्याचं कळताच गावात बैठक बोलावण्यात आली आणि हा प्रकार सामंजस्याने सोडवू असं या पिडीतेच्या पालकांना सांगण्यात आलं. पंचायतीच्या बैठकीसमोरही या पालकांनी आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचं सांगितलं. यावर पंचांनी प्रकरण इथेच मिटवू असं म्हणत त्यांना दमबाजी केली. यानंतर बलात्काऱ्यांकडून दंडापोटी प्रत्येकी १० हजार रुपये वसूल करण्यात आले आणि त्यातून मटन पार्टी आयोजित करण्यात आली. या गावजेवणानंतर जे पैसे उरले होते ते मुलींच्या पालकांना न देता गावातील लोकांमध्ये वाटून टाकण्यात आले.


























































