सासऱ्याचा अंत्यविधी करून परतणाऱ्या दोन सुनांना ट्रकने चिरडले, पाच महिलांसह सहा जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासऱयाचा अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात भरधाव ट्रक घुसला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच महिला व एक पुरुष असे सहाजण जखमी झाले आहेत. पंढरपूर शहराजवळील टाकली गुरसाळे या गावात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. अपघातात ठार झालेल्या दोन्ही महिला अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीच्या सुना आहेत. याप्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिराबाई भारत गुटाळ (वय 45) आणि मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40, दोघीही रा. टाकळी गुरसाळे, ता. पंढरपूर) असे मृत्यू झालेल्या सुनांची नावे आहेत.

पंढरपूर तालुक्यातील टाकळी गुरसाळे येथील गेनदेव मनोहर गुटाळ यांचे शुक्रवार (दि. 19) रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मध्यरात्री गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर-वेनेगाव रोडच्या डाव्या बाजूने घराकडे येत होत्या. त्यावेळी टेंभुर्णीकडून येणारा भरधाव मालट्रक महिलांच्या जमावामध्ये घुसला. मालट्रकने पाठीमागून धडक दिली. यामध्ये मयत गेनदेव गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई गुटाळ (वय 45) आणि मुक्ताबाई गुटाळ (वय 40) या जागीच ठार झाल्या.

तर सुनीता महादेव गुटाळ, आनंदाबाई धनेश्वर साळुंखे (दोघी रा. चिखलठाणा, ता. करमाळा), सुधामती साहेबराव धुमाळ (रा. निंबवडी, ता. बारामती), मुक्तामाई गोरख गुटाळ (रा. कुगाव, ता. करमाळा), अनिता ऊर्फ गीतांजली जयहिंद देवकर (रा. सुगावू भोसे, ता. पंढरपूर) तसेच दत्तात्रय अजिनाथ सरडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक गोविंदराज कान्डा स्वामी (वय 23, तामीळनाडू) याला पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.