‘पापमोचनी’चे स्नान अस्वच्छ पाण्यात, भाविकांतून संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन आणि चंद्रभागा नदीचे स्नान करण्यासाठी पंढरीत दाखल झाले होते. मात्र, अपुरे पाणी आणि अस्वच्छ परिसर पाहून भाविकांनी संताप व्यक्त केला, तर काही भाविकांनी याच दुर्गंधीयुक्त पाण्यात स्नान केले.

वारकरी संप्रदायात पापमोचनी एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशी पर्वणीच्या निमित्ताने भल्या पहाटेपासून भाविकांनी चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी गर्दी केली होती. वाळूमाफियांनी विष्णूपद बंधाऱयाची दारे उघडी केल्याने पात्रातील पाणी वाहून गेले आहे. पात्रात पुरेसे पाणी नसल्याने, डबक्यामध्ये साठलेल्या पाण्यात शेवाळांचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण पात्रात जुन्या कपडय़ांच्या चिंध्या, देवदेवतांचे फोटो, भंगलेल्या मूर्ती आणि निर्माल्य पसरले आहे. नदीपात्राची झालेली ही दुर्दशा पाहून भाविकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जुना पूल बंधाऱयातून पाणी सोडून भाविकांची गैरसोय दूर करायला हवी होती. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागल्याचे काही भाविकांनी बोलून दाखविले.

नमामि चंद्रभागा प्रकल्प कागदावरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ या दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा झाली. मात्र, गेली पाच वर्षे झाली हा प्रकल्प कागदावरच आहे.