पंढरपुरात आठ दिवसांची संचारबंदी, आषाढीवारी प्रातिनिधिक; वारकऱ्यांनी वारीला न येण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत्या 20 जुलैला साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीचा सोहळा शासनाच्या वतीने प्रातिनिधिक व मर्यादित स्वरूपात साजरा होत आहे. या काळात परवानगीधारक भाविकांव्यतिरिक्त कोणीही पंढरपुरात येऊ नये. म्हणून त्रिस्तरीय नाकाबंदीसह 18 ते 25 जुलैदरम्यान पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात एसटी बस आणि जड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. दरम्यान, पंढरपूर परिसरातील 9 गावांत 5 दिवसांची संचारबंदी राहील.

आषाढी वारीला दरवर्षी कर्नाटक, आंध्र, केरळ, तामीळनाडू आदी भागांतून 12 ते 16 लाख भाविक येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून यात्रा केवळ परंपरा जपण्यासाठी प्रातिनिधिक व मर्यादित स्वरूपात साजरी केली जात आहे. त्या अनुषंगाने मानाच्या दहा पालख्या व त्या पालख्यांसमवेत परवानगी दिलेल्या विश्वस्त, महाराज, भाविक यांनाच पंढरपुरात येण्याची परवानगी दिली होती. यावर्षीही याप्रमाणेच यात्रा साजरी होणार आहे.

परवानगी दिलेल्या भाविकांव्यतिरिक्त इतर नागरिकांनी पंढरपुरात येऊ नये म्हणून दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 25 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत शहरात, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट, मंदिर परिसरात संचारबंदी असणार आहे. या काळात दि. 17 ते 25 जुलैपर्यंत एसटी बससेवा व सर्व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. तर, पंढरपूर शहरालतच्या गोपाळपूर येथे दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील लक्ष्मी टाकळी, वाखरी, गादेगाव, काwठाळी, भटुंबरे, शेगाव दुमाला, चिंचोली भोसे, शिरढोण, कोर्टी आदी गावांतही दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 22 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.