पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेतील जनावरांचा बाजार रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्तिक यात्रा कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार लंपी या त्वचेच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे व कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्याकरीता कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने रद्द करण्यात आला आहे. याबाबत अधिकृत प्रसिध्द पत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी भरणारा जनावरांचा बाजार यावर्षी खंडीत होणार आहे.

सोलापूर जिल्हयामधील जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीज या विषाणुजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर आजार संसर्गजन्य असल्याने या रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाहयकिटकाद्वारे, लाळ व स्त्राव इत्यादी माध्यमातून होत आहे. सदर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे सद्यस्थितीत आवश्यक आहे. सोलापूर जिल्हा नियंत्रीत क्षेत्रफ घोषीत केलेला असुन गो जातीय जनावरांना ने-आण करण्यास मनाई, प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांचे शर्यती लावणे, प्राण्यांचे जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे आणि प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रीत करून अन्य काम पार पाडणे यांस महाराष्ट्र शासन अधिसुचना नुसार मा.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर यांनी दि.29सप्टेंबर रोजी पत्रक काढून मनाई करण्यात आलेली आहे.त्यानुसार जनावरांचा बाजार बंद करणे विषयी उचित कार्यवाही करावी याबाबत बाजार समितीला कळविलेले आहे.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडुन दि.30 नोव्हेंबर पर्यंत लॉकडाउनची बंधने लागू केलेली आहेत. त्यामुळे दि. 22 ते दि.28 अखेर कार्तिक यात्रा कालावधी मध्ये भरणार्‍या बाजारा मोठया प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्तिक यात्रा कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार या बाजार समितीच्या वतीने रद्द करण्यात येत आहे. तरी सर्व शेतकरी, पशुपालक, जनावरांचे व्यापारी व संबंधीत घटकांनी कार्तिक यात्रा जनावराच्या बाजारात कृपया आपली जनावरे रेदी-विक्रीसाठी आणु नयेत. याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे. असे आवाहन बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे व उपसभापती विवेक देविदास कचरे यांनी केले आहे.