पंढरपूर पोट निवडणुकीत चुरस, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.81 टक्के मतदान

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 57.81 वर पोहचली आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे.

मतदान केंद्रावर सकाळी तुरळक गर्दी होती. मात्र 9 वाजल्यानंतर हळूहळू गर्दी वाढू लागली. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने वेग मंदावला मात्र 4 नंतर पुन्हा गर्दी वाढू लागली. विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 3 लाख 40 हजार 889 इतकी आहे. यापैकी 1 लाख 97 हजार 55 मतदारांनी आपला हक्क बजावला.

ही विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत असून या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवार संख्या 19 असली तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान आवताडे यांच्यातच होईल असे चित्र आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाय योजना केल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात देखील मोठी वाढ केली असल्याने मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या