
सुनील उंबरे । पंढरपूर
‘मंदिर समितीची आर्थिक परिस्थिती भक्कम असताना देखील गोशाळेतील गायींना पोटभर चारा न देता त्यांना उपाशी ठेवले जाते. चाऱ्याऐवजी कागद, प्लाष्टिक पिशव्या आणि कपड्यांचे तुकडे खायला दिले जात असल्याने मंदिर व्यवस्थापनाची ही कृती गायीची हत्या करण्यासारखी आहे. समितीच्या या कृतीमुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून भारतीय दंड विधान कलम २९५ आणि कलम ४२९ अंतर्गत (Prevention of Cruelty to Animals Act च्या कलम ११ (एच) आणि (आय)) मंदिर समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्तींवर गोहत्येचा गुन्हा दाखल करावा’, अशी तक्रार श्री विठ्ठल-रुक्मिणी कृती समितीचे सचिव पुरुषोत्तम लंके यांनी पंढरपूर शहर पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत लंके यांनी ‘दैनिक सामना’च्या बातमीचा संदर्भ दिला असून मंदिर समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी मी हिंदू आहे आणि माझ्या धर्मात गाय ही पूजनीय मानली आहे. मंदिर समितीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या गोशाळेत गायींचे संगोपन व्यवस्थित केले जात नाही हे पुराव्यासह समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी याच गोशाळेतील गायीचा उपासमारीमुळे आणि प्लास्टिक, कापड, तारा, चपला खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले होते. या बाबतीमध्ये कृती समितीने मंदिर समितीला सुधारणा करण्याबाबत सूचित केले होते. मात्र नव्याने समोर आलेल्या घटनेवरून समितीच्या कामकाजात कसलाही बदल झालेला दिसत नाही.
समितीच्या गोशाळेत १५० गायींचे संगोपन केले जात आहे. त्यासाठी वर्षांला ४२ लाख रुपये चारापाण्यासाठी खर्ची टाकले जातात असे व्यवस्थापनाकडून सांगितले जाते. मग इतका मोठा निधी उपलब्ध होत असताना गोशाळेतील गायींची अवस्था मरणासन्न का आहे. याचा अर्थ गायींची हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांना जाणीवपूर्वक विघातक खाद्य दिले जात आहे का याचा शोध पोलिसांनी लावावा.
गोमाता ही हिंदू धर्मियांची पूजनीय असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना समितीने दुखावल्या आहेत. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम २९५ आणि कलम ४२९ अंतर्गत मंदिर समितीचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, विश्वस्त व इतर जबाबदार घटकावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी लेखी तक्रार श्री विठ्ठल-रुक्मिणी कृती समितीचे सचिव पुरुषोत्तम लंके यांनी पंढरपूर शहर पोलिसांकडे दिली आहे. या मागणीला बजरंग दलाचे सुनील बाबर, हिंदू महासभेचे बाळासाहेब डिंगरे, अभयसिंह कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे सौरभ थिटे, मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रतापसिंह साळुंके, गणेश लंके, वीर बाजीप्रभू प्रतिष्ठानचे ओंकार कुलकर्णी, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, वनवासी कल्याण आश्रमचे सारंग बडोदकर, हिंदू जनजागृती समितीचे शशीशेखर पाटील, हिदुत्वनिष्ठ वीरेंद्रसिंह उत्पात, रामेश्वर कोरे पाठींबा दर्शविला असून कारवाईची मागणी केली आहे.





























































