
शब्दांकन -शिल्पा सुर्वे
आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे पंडित वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 2 मेपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने वसंतरावांचे पट्टशिष्य पंडित चंद्रकांत लिमये यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘कटय़ार काळजात घुसली’ मध्ये खाँसाहेबांची भूमिका करून मी काही अंशी गुरुऋण फेडलं. खरं तर गुरूचे ऋण कधी फिटत नसते, ते आयुष्यभर फेडायचं असतं. सांगताहेत पंडित चंद्रकांत लिमये.
कलेच्या प्रांतात अशा काही असामान्य व्यक्ती जन्माला येतात की, त्यांना इतर सामान्य व्यक्तींचे नियम लागू होत नाहीत. सामान्यांपेक्षा वेगळा विचार करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे असते. या असामान्य व्यक्तींना परमेश्वरी दिव्य स्पर्शाची प्रतिभा लाभलेली असते. दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेली व्यक्तीच आपल्या क्षेत्रात क्रांती घडवू शकते. वसंतराव देशपांडे ही अशीच व्यक्ती होती. त्यांनी अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल 12 वर्षे मला त्यांचा आशीर्वाद लाभला, त्यांचा सहवास लाभला. वसंतराव देशपांडे यांच्याशी म्हणजेच बुवांशी माझी पहिली भेट ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकाच्या वेळी झाली. पणशीकरांना सदाशिवची भूमिका मला द्यायची होती, पण माझी उंची अभिनेत्री फैयाजपेक्षा कमी. त्यामुळे पणशीकर जरा नाराज झाले. मग ‘‘चाँद उस्मानची भूमिका करणार का?’’ अशी मला विचारणा झाली. तोपर्यंत नाटकात काम करण्याची वगैरे माझी काही महत्त्वाकांक्षा नव्हती. मी लगेच होकार दिला. गोव्याच्या प्रयोगाला बुवा सगळ्यांना बसून शिकवत होते. मी जरा लांबच बसून ऐकत होतो. शंकरराव घाणेकर पटकन म्हणाले, ‘‘अरे मुला, इथं काय बसलायस? जा, पुढे बस. बुवा, याला पण शिकवा.’’ त्या दिवशी मी प्रकाश घांग्रेकराच्या हातून जो तंबोरा घेतला, तो पुढे बारा वर्षे खाली ठेवला नाही. बुवांचा लाडका शिष्य बनलो.
सुरुवातीला मी बुवांना खूप घाबरायचो. एकदा एका कार्यक्रमानिमित्त बुवा शिवाजी पार्क परिसरात बालाजी जोशी यांच्या घरी उतरले होते. बालमोहन शाळेच्या हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मी बालाजी काकांना फोन केला तेव्हा नेमका तो बुवांनी उचलला. मी म्हणालो, ‘‘बालाजी काका बोलताय का?’’ पलीकडून ‘‘हो’’ असे उत्तर आले. मी पुढे म्हणालो, ‘‘वसंतराव देशपांडे आलेत का?’’ पलीकडून ‘‘नाही’’ असे सांगितले. मी पुढे म्हणालो, ‘‘उद्या त्यांचा कार्यक्रम आहे ना, मी तंबोऱयावर मागे बसायला येऊ का? हे त्यांना विचारायचे होते.’’ वसंतराव म्हणाले, ‘‘या तुम्ही.’’ मी म्हटले, ‘‘मला वसंतरावांना विचारायचंय. त्यांना आवडले नाही तर…’’ तेव्हा पलीकडून आवाज आला की, ‘‘मीच वसंतराव बोलतोय.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘या, पण बरोब्बर चार वाजण्याच्या आधी या.’’ मी आनंदून गेलो. बुवा खूप वक्तशीर होते. एक मिनिटही उशीर त्यांना चालायचा नाही. त्या दिवशी मी दिलेल्या साथीबद्दल बुवांकडून कौतुकाची थाप मिळाली. माझे वडील बुवांचे बालमित्र असल्याचे तेव्हाच समजले. मला बुवांनी फक्त एकच नाटय़पद शिकवलं. ‘सुरसुखखनी तु विमला…’ बुवांनी अक्षरश ते गाणं माझ्याकडून घोटून घेतलं. त्याच्यातील जागा न जागा धुंडाळल्या. ‘‘बघ, इथे राग दिसतो का, तिथे दिसतो का?’’ असे म्हणत त्यांनी मला शिकवलं. त्या एकाच नाटय़पदाच्या शिक्षणामुळे अख्ख्या इंडस्ट्रीतील नाटय़पदं कशी गायची ते मला समजलं. इतकं अफलातून शिक्षण होतं ते. मी अभिनय करायचो, पण माझं पूर्ण लक्ष त्यांच्या गाण्याकडे असायचं. मी बुवांसोबत दहा वर्षे ‘कटय़ार…’ केलं. नाटक तर व्हायचं… पण दौऱयात सकाळी उठून बुवांसोबत माझा रियाज सुरू व्हायचा. मला तशी विशेष परवानगी होती. मी लाडका होतो ना… बुवांनी माझी क्षमता ओळखली होती. ते मला संगीत ज्ञान देत होते आणि मी दोन्ही करांनी भरभरून घेत होतो.
वसंतरावांनी ‘कटय़ार…’मधील खाँसाहेब आपल्या गायन-अभिनयाने अजरामर केला. बुवांच्या पश्चात खाँसाहेबांची भूमिका माझ्याकडे आली. गुरूची भूमिका शिष्याकडे…कसले ईश्वरी संकेत होते ते! या भूमिकेसाठी फक्त दोन प्रकारच्या नटाचा विचार होऊ शकत होता. एक म्हणजे स्वतची गायकी प्रस्थापित करू शकणारा समर्थ गायक आणि चांगला अभिनेता. दुसरा म्हणजे बुवांच्या घराण्याचा चांगला अभिनेता आणि गायक. कारण ‘घेई छंद…’ ची तान ही गायकीतून आलेली तान आहे. तानेची नक्कल करून गायकी येत नाही. त्यासाठी आजन्म झिजवावा लागतो.
‘खाँसाहेबांच्या भूमिकेत बुवांचा शिष्य चंद्रकांत लिमये’ अशी माझ्या नावाची घोषणा झाली. जाहिराती निघाल्या. 8 एप्रिल 1997 रोजी ‘कटय़ार…’चा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर नाटय़गृहात पार पडला. खरं सांगायचं तर मी घाबरलो नव्हतो, पण रात्रभर मला झोप नव्हती. प्रयोगाच्या आदल्या दिवशी माझे पोट बिघडले. तालमीसाठी दारव्हेकर मास्तर आठ दिवस माझ्या घरात तळ ठोकून होते. बुवाची भूमिका करायची म्हणून दडपण होते. प्रयोग सुरू झाला, मी स्टेजवर जाऊन ‘उस्मान’ अशी खणखणीत हाक मारली आणि काय सांगू, टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. पणशीकर तर ‘‘काय होईल’’ या भीतीने आत बसले होते. त्यांचा मॅनेजर धावत आत गेला, त्यांना म्हणाला, ‘‘पंत, एंट्रीला टाळ्या आहेत. या बाहेर.’’ पहिला अंक झाल्यावर माझा मित्र रमेश भाटकर आत आला. ‘‘काय बेअरिंग घेतलंस मित्रा! केवळ गाण्याचं नव्हे तर काय अभिनयाचंही,’’ असं म्हणत माझी पाठ थोपटू लागला. प्रयोगानंतर व. पु. काळे तर रडायला लागले. त्यांनी मला मिठी मारली. ‘‘बुवांची आठवण करून दिलीस’’ असं म्हणत पाचशे रुपये मला बक्षीस दिले. बुवांच्या आठवणीने माझं मन भरून आलं. पहिला प्रयोग सॉलिड उचलला गेला. ‘‘कटय़ार…’ला मिळाला राजबिंडा खाँसाहेब…’’ अशी एका वर्तमानपत्राची हेडलाइन छापून आली. वसंतरावांनी करारी खाँसाहेब उभे केले होते. त्यांच्या काळात त्यांचे गुरुजन तसेच तापट होते. त्यांची तानही आक्रमक असे. मी माझ्या गुरुजींना खाँसाहेबाच्या रूपात उभे केले. बुवा आणि दारव्हेकर मास्तर या दोघांमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली हेच खरे.
‘कटय़ार…’ मध्ये खाँसाहेबांची भूमिका करून मी काही अंशी गुरुऋण फेडलं. खरं तर गुरूचं ऋण कधी फिटत नसतं. ते आयुष्यभर फेडायचं असतं. ते फेडण्याची माध्यमं किंवा अंगं वेगवेगळी असू शकतात. शिष्यांना चांगल्या तऱहेने शिकवणे हेदेखील गुरुऋण फेडणेच असते.
मी वसंतराव देशपांडे संगीत सभेची स्थापना 16 ऑगस्ट 2000 रोजी केली. वसंतरावांच्या गायकीचे जतन करण्यासाठी, तो स्वतंत्र विचार पुढे नेण्यासाठी ही संस्था 18 वर्षे अविरत प्रयत्न करीत आहे. येत्या 5 मे रोजी बुवांच्या जन्मशताब्दी वर्ष शुभारंभाचा कार्यक्रम आम्ही रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित केला आहे. वसंतराव देशपांडे संगीत सभेच्या माध्यमातून बुवांच्या गायकीवर एक अनोखी फिल्म साकारण्याचे माझे स्वप्न आहे. कोणत्याही घराण्याच्या मूळ पुरुषाने आपली गायकी कशी घडवली, ती काय आहे हे विशद करून सांगणारी फिल्म आजतागायत कुणी केलेली नाही. मी केली तर मी पहिला असेल. बुवांनी हिंदुस्थानी संगीतातील सर्व वाहत्या प्रवाहांचा वेध घेतला. त्या सखोल अभ्यासातून, चिंतनातून त्यांना एका वेगळ्या प्रवाहाचा शोध लागला आणि त्यांनी स्वतŠची नवीन धारा, गायकी निर्माण केली. त्यांचे एक स्वतंत्र घराणे, एक धारा आहे. बुवांच्या आवाजाच्या लगावापासून गायकी सुरू होते. त्यांच्या सुरांचा लगाव पाण्यासारखा निर्मळ आणि साधा आहे. श्रद्धापूर्वक शिकणं, गुरूंचा सहवास आणि गुरूवरचं नितांत प्रेम या गोष्टी ज्याला मिळतात, त्याला गायकीचा वसा मिळतो. मला तो मिळाला हे माझं परमभाग्य. तोच वसा माझ्या शिष्यांना देऊन गुरुऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. गुरू एक जगी त्राता, गुरू कृपासिंधू, गुरू दीनबंधू, गुरू जननी जन्मदाता!





























































