दादरमध्ये ‘पीएनजी’ गॅस पाईपलाइन फुटल्याने घबराट; अर्धा तास वाहतूक वळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरच्या गोखले रोडवर आज सायंकाळी 6 वाजता ‘पीएनजी’ गॅस पाईपलाइन फुटल्याने परिसरात एकच घबराट उडाली. पाईपलाइनमधून मोठय़ा प्रमाणात गॅस बाहेर पडू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. या घटनेमुळे पोर्तुगीज चर्च ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान या मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासासाठी वळवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

दादरच्या अमर हिंद मडळाजवळ पालिकेच्या उद्यान विभागाकडून एक झाड महिनाभरापूर्वी तोडण्यात आले होते. त्या झाडाचा बुंधा आज जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीचा धक्का लागून घरगुती ‘पीएनजी’ गॅसलाइन फुटली. यामुळे काही वेळातच कारंजांप्रमाणे अतिशय वेगाने गॅस बाहेर येऊ लागला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. मात्र यावेळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. शिवाय महानगर गॅसच्या कर्मचाऱयांच्या सहाय्याने लिकेज बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली. यावेळी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतुकीचे नियंत्रण केले. सुरक्षेसाठी घटनास्थळ निर्मनुष्य करण्यात आले. सुमारे अर्ध्या तासातच हे लिकेज बंद करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

शिवसैनिकांडून सतर्कता

गोखले रोडवर गॅस पाईपलाइन फुटल्याचे समजताच दादर विभागातील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरात गॅसची दुर्गंधी पसरून घबराट निर्माण झाल्यामुळे शिवसैनिकांनी रहिवाशांना घाबरून जाऊ नका असे आवाहन करून अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलिसांना पाचारण केले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार महेश सावंत, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, उपविभागप्रमुख सिद्धार्थ कदम, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.