धनंजय मुंडे पवार घराण्याची चमचेगिरी करतात, पंकजा मुंडेंची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते हे पक्षविरोधी नेते असून ते पवार घराण्याची चमचेगिरी करतात. अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. तसेच या नेत्याला व लोकांची घरे फोडणाऱ्या राष्ट्रवादी  काँग्रेसच्या नेत्यांना पाथर्डी चा हिसका दाखवा आणि डॉ. सुजय विखे व डॉ. प्रीतम मुंडे या दोन्हीही डॉक्टरला लोकसभेत पाठवा असे आवाहनी त्यांनी यावेळी केले. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येथील बाजार समितीच्या मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “लोकांची घरे फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते करत असून त्यांच्या या उद्योगामुळे सुजय विखे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या आई व वडिलांना येता येत नाही. तर आमदार कर्डिले व आमच्या घरात सुद्धा यांनी भांडणे लावण्याचे उद्योग केले आहेत. सुजय विखे भाजपात आले तर  धनंजय मुंडे यांना पोटदुखी झाली मात्र ते स्वतः भाजप आमदार असताना त्यांनीच मागच्या दाराने आपल्या वडिलांना राष्ट्रवादीत पाठवले होते हे ते विसरले का? बीड जिल्ह्यातील घराणेशाहीवर टीका करणाऱ्या मुंडेंना रोहित व पार्थ पवार ची घराणेशाही दिसत नाही का? या दोन्ही पवारमध्ये कोणते पवार मोठे आहे हे त्यांना विचारले तर सर्व पवार मोठे असल्याचे उत्तर त्यांनी देत पवार घराण्याची चमचेगिरी केली आहे. दर एका कि.मी. ला वेगळी भूमिका घेण्याचे काम सध्या चालू आहे.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

कोणत्याही परिस्थितीत विखे याना निवडून द्या व मला मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.