पंकजा मुंडेंची भाजपच्या संभाजीनगर बैठकीलाही दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक पोस्ट व्हायरल करून नाराजीचे निशाण फडकवणाऱया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाडा विभागीय बैठकीलाही दांडी मारल्यामुळे भाजपची धडधड वाढली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करून आपल्या परवानगीनेच पंकजा मुंडे बैठकीला गैरहजर राहिल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र एकनाथ खडसे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले.

परळीतून झालेला पराभव जिव्हारी लागल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट व्हायरल करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथगडावर होणाऱया मेळाव्यात आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. या पोस्टमुळे नाराज पंकजा भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र पंकजांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या आज झालेल्या विभागीय बैठकीला पंकजा यांनी दांडी मारल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

भाजपच्या आज झालेल्या विभागीय बैठकीवर पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीचे गडद सावट होते. या बैठकीत आगामी वाटचालीवर चिंतन करण्यात आले. मराठवाडय़ात ओबीसी, त्यातही वंजारी मते मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे पंकजांच्या नाराजीचा जबर फटका भाजपला बसू शकतो अशी ‘कुजबुज’ चर्चाही बैठकीत झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांची सारवासारव
पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चा होत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांसमोर येऊन सारवासारव करावी लागली. पंकजा मुंडे यांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे आपल्याला कळवले आहे. त्याबरोबरच 12 डिसेंबरच्या मेळाव्याची तयारी करावयाची असल्यामुळे आपण या बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे मीच त्यांना बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी दिल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मात्र पाटील यांनी मौन बाळगले.