पंकजा मुंडे लागल्या निवडणुकीच्या तयारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांप्रमाणे तुम्ही माझे लढवय्ये व विश्वासू सैनिक आहात, प्रसंगी उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत कारण माझ्या झेंड्यावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो आहे. आपली लढाई नकारात्मक विचारांच्या लोकांसोबत आहे, त्यामुळे एकजुटीने काम करा,आपापला गड राखा आणि निवडणूकीची लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या बुथप्रमुखांमध्ये उर्जा निर्माण केली.

परळी मतदारसंघातील भाजपच्या बुथप्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक आज एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाली त्यावेळी उपस्थित बुथप्रमुखांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. बैठकीस खा. डॉ. प्रितम मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा सरचिटणीस सुभाष धस, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, नामदेवराव आघाव, श्रीहरी मुंडे, गौतमबापू नागरगोजे, युवा नेते रामेश्वर मुंडे, श्रीराम मुंडे, शेख अब्दुल करीम, वैजनाथ जगतकर, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आदी उपस्थित होते.

प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरवात करण्यात आली. यावेळी बैठकीत ना पंकजाताई मुंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना चार्ज केले. निवडणूक ही एखाद्या युध्दासारखीच असते. यात माझी भूमिका सेनापतीची आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून सार्वजनिक विकासाची कामे करण्याबरोबरच प्रत्येकाची वैयक्तिक कामे करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पीक विमा, कर्ज, अनुदान, आजारी रूग्णांना मदत याद्वारे प्रत्येक घरापर्यंत मी गेले आहे. एखादे काम होईल न होईल पण मनोबल खच्चीकरण होवू देवू नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत आपला पराभव झाला पण ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका मोठ्या संख्येने जिंकल्या तसेच जिल्हा परिषदेतही सत्ता आणली. अशक्य वाटणारी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूकही जिंकली. मतदारसंघ बदला म्हणून लोक मला आग्रह करतात पण हा गड मुंडे साहेबांचा आहे, तो मला अबाधित ठेवायचा आहे असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांचा व विकासाचा वारसा जपत सर्व सामान्यांची कामे करण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

तटबंदी अभेद्य ; विरोधकांना ठणकावले
ज्यांच्यावर घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत अशांच्या नादी लागू नका, स्वतःची शक्ती ओळखा असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी खोटं बोलणं, पाठिमागून वार करणं आम्हाला जमत नाही आमच्या गडाची तटबंदी अभेद्य आहे, कुणी कितीही हल्ले केले तरी या भिंती कुणीही भेदू शकणार नाही. आमच्या पराभवाची त्यांची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत अशा शब्दांत विरोधकांना ठणकावले.

मताधिक्य वाढीसाठी ताकद लावा – खा. डॉ. प्रितम मुंडे
मुंडे साहेबांच्या पश्चात ना. पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण जिल्ह्याला आधार देण्याचे काम केले आहे. हा जिल्हा त्यांच्यामुळे विकासाचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुमची आहे. इतर माध्यमांप्रमाणे माऊथ पब्लिसिटी हे एक चांगले माध्यम आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगल्या कामाची माऊथ पब्लिसिटी करावी असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांचा मतदारसंघातील विजय कोणीही रोखू शकणार नाही. त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून मागच्या वेळेपेक्षा दुपटीने मताधिक्य वाढविण्यासाठी ताकद पणाला लावा असे आवाहन खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी यावेळी केले.