मेसेजिंग अ‍ॅपवर चाईल्ड पोर्नोग्राफीतून कमवाकमवी, पनवेलमधील तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

टेलिग्राम या मेसेजिंग अ‍ॅपवर चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधी व्हिडीओ पाठवून मोबदल्यात पैसा कमावणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी पनवेल येथून अटक केली आहे. हा किळसवाणा गुन्हा करणाऱ्या पियुष मोरे (23) या तरुणाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

टेलिग्राम या अ‍ॅपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधी बऱ्याच चित्रफिती, व्हिडीओ, लिंक्स यांचे वाटप बेकायदेशीरपणे टेलिग्राम या प्लॅटफॉर्मवर वितरित होत असल्याचे नोडल सायबर पोलिसांच्या निर्दशनास आले. पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषन केल्यावर चाईल्ड पोर्नोग्राफी करणारा आरोपी पनवेल येथेराहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पनवेल येथील उर्सली उचंबे मार्गावरील मोरया गार्डन रेसिडन्सीमध्ये राहणाऱ्या पियुष मोरे या तरुणाला अटक केली. त्याचा मोबाईल जप्त करून तपासणी केली असता त्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक व्हिडीओ आढळून आले. तसेच त्याच्या बँक खात्यात अशा व्हिडीओच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराचे तपशील देखील सापडले.