
पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म खूप लांब गेल्याच्या आणि प्रवाशांना प्रचंड पायपीट करावी लागत असल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांचे मध्य रेल्वेने स्पष्टपणे खंडन केले आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पनवेल उपनगरीय टर्मिनस येथील विद्यमान हार्बर लाईन प्लॅटफॉर्मचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील भाग केवळ ९० मीटरने, म्हणजेच सुमारे तीन डबे मावतील एवढ्याच अंतराने पुढे सरकवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ दोन ते तीन मिनीटे जास्त चलावे लागणार असल्याचे ‘मरे’ने म्हंटले आहे.
सध्या सोशल मीडियावर हा प्लॅटफॉर्म तब्बल १ किलोमीटरने वाढवण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता श्रीकुमार यांनी स्पष्ट केले की प्लॅटफॉर्मचा विस्तार केवळ ९० मीटरचाच असून, यामुळे प्रवाशांना फक्त दोन ते तीन मिनिटे अतिरिक्त चालावे लागत आहे.
पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग हार्बरला जोडण्याचे काम; सहा महिने सहकार्य करा
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या निर्माणाधीन असलेल्या महत्त्वाकांक्षी पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गिकेचे काम विद्यमान हार्बर लाईनशी जोडण्यासाठी हे विस्तारीकरण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे अंतिम बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. सहा महिने बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे




























































