जनता कर्फ्यूला परळीत नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

576

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानात रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. याच्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला परळीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. सर्व नागरिक आपल्या घरातच बसून आपले कर्तव्य पार पाडले. पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथांच्या परळीत नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रविवारी शहरातील बहुतांश भाग निर्मनुष्य असल्याचे पाहायला मिळाले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये केंद्र व राज्य सरकारकडून सचोटीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण राज्यभरात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल, कृषि उत्पन्न बाजार समिती, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, तळ परिसरात नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. आज मात्र या ठिकाणी होते फक्त काही पोलीस कर्मचारीच होते.छोट्या गल्लीसह मोठे रस्ते ओस पडल्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसत होत्या.

कोरोना ना हद्दपार करण्यासाठी याआधीच प्रशासनाने पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिरासह, दक्षिण मुखी गणेश मंदिर, जगमित्र मंदिर बंद केले असून नागरिक जमा होणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. शनिवारी करण्यात आलेल्या परळी लॉक डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली होती. तर शासनाचा आदेश न पाळणाऱ्या शहरातील 19 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकंदरीत शासनाच्या आवाहनाला परळीतल्या नागरीकांनी जाणिवेची जोड देत आपलेही कर्तव्य पूर्ण केल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या