
परळी परिसरात वीट भट्टयांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच आता नवीन संकटात परळीकर सापडले आहेत. नगर परिषदेचा नंदागौळ येथे असेलेला कचरा डेपो गेले चार-पाच दिवसांपासून आगीत धुमसत असून यातून निघणाऱ्या धुराने याचा त्रास शहरातील सर्व नागरिकांना होत आहे. याकडे परळी नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
थर्मल पॉवर स्टेशनच्या राखेमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे नगर परिषदेचा स्वछता विभाग महिन्याला लाखो रुपये खर्च करत असतो. मात्र कचरा डेपोवरील कचरा व्यवस्थापन होत नसल्याने हा कचरा डेपो आता चिंतेची बाब बनू लागला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून कचरा डेपो आगीत धुमसत असून यातुन निघणाऱ्या विषारी वायूंमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नंदागौळ रस्त्यावर असलेल्या कचरा डेपो तात्काळ शहरापासून दूर हलवण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासाचा दावा करणाऱ्या नगर परिषद सत्ताधारी याकडे डोळेझाक करत असून आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची चर्चा आता नागरिकांतून होत आहे.



























































