
परळी महावितरणच्या गलथान कारभाराने वीज ग्राहक वैतागुन गेलेले दिसून येत आहेत. महावितरणने ग्राहकांना दिलेल्या वीज बिलामध्ये चुकीच्या रीडिंगमुळे अव्वाच्या सव्वा रकमेचे बिल येत असून अधिकारी मात्र मार्च अखेरचे आपले वसुली ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा बंद करत आहेत. एकीकडे बोर्ड परीक्षा सुरू असतानाच महावितरण कडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या बिलाच्या वसुलीने वीज ग्राहकात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. आधी आम्हाला आलेले चुकीचे बिल दुरुस्त करून द्या, नंतर आम्ही बिल भरतो अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
परळी येथील महावितरण कार्यालयाकडून वीज ग्राहकांना नेहमीच चुकीची बिले दिली जातात. ती बिले दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना अक्षरशः आपल्या चपला झिजवाव्या लागतात. तरीही असे करूनही त्यांच्या विजबिलात दुरुस्ती करून दिली जात नाहीत. पुढे हेच बिल थकीत होऊन महावितरण कर्मचारी, अधिकारी ग्राहकांना वसुलीसाठी तगादा लावत त्यांचा वीजपुरवठा खंडित करतात. आता मार्च अखेरच्या नावाखाली आपली वसुली पूर्ण होण्यासाठी आपण दिलेल्या चुकीच्या बिलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या बोर्ड परीक्षा परळी शहर व ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी देत आहेत. या वसुलीने त्या विद्यार्थ्यांना पहाटे, रात्री लाईट नसल्याने अभ्यास करता येत नाहीये.
शहरात आणि ग्रामीण भागात जवळपास 70 ते 80 टक्के वीज ग्राहकांना अवाढव्ये बिले दिले आहेत. यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी वीजग्राहक हैराण झाला आहे. एकीकडे बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही कुणीही दखल घ्याला तयार नाही तर दुसरीकडे महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली सुरु केली आहे. यामुळे वीज ग्राहक वैतागले असून संबधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी ग्राहकांची बिले आधी दुरूस्त करून द्यावीत नंतरच वसुली करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते महादेव गित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
























































