
सामना प्रतिनिधी । परभणी
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक कोपऱ्यांमध्ये कचऱ्यांचे ढिग साचलेले दिसत आहेत. या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रुग्णालयातील अनागोंदी कारभारास आवर घालावा, अशी मागणी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालये अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयात ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, औषधांचा तुटवडा त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागत आहेत. तसेच या रुग्णालयातील एम.आर.आय.ची मशीन मागील अनेक दिवसांपासून धूळखात पडून आले. रुग्णालयात सफाई कामगार असूनही स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसत आहे. दररोजची रुग्णसेवा ही केवळ नावालाच उरली असल्याचे चित्र निर्माण झाले असून रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना सेवा उपलब्ध करुन दिली जात नाही याबद्दल अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. सर्वात गंभीरप्रश्न पिण्याच्या पाण्याचा बनला असून रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याने रुग्णांवर उपचार वेळेत केले जात नाहीत. रुग्णांना बाहेरगावी उपचारार्थ पाठविण्यासाठी विशेष भर दिला जातो. या रुग्णालयात ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण येत असतात. ओपीडीला भल्या मोठ्या रांगाच रांगा दिसत असून रुग्णांची व्यवस्थित तपासणी केली जात नाही. योग्य उपचार मिळत नसल्याच्या कारणाने अनेकांना अखेर खाजगी रुग्णालयाकडे वळण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ फिसची आकारणी केली जात आहे. ती सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने रुग्ण नाईलाजास्तव जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायरी चढतो.
या रुग्णालयात गेल्यानंतर बँडेज पट्टीपासून ते औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे कारण सांगत अनेक डॉक्टर्स रुग्णांना बाहेरुन औषधी आणण्यास भाग पाडतात. रुग्णांलयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. डॉक्टर मंडळी बिनधास्तपणे औषधी लिहून देत आहेत आणि बाहेरुन औषधी खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. अनेक विभागाचा कारभार राम भरोसे झाला आहे. रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर रुग्णसेवक यांच्यावर रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही. परिणामी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक समस्यांच्या विळख्यात जिल्हा सामान्य रुग्णालय असून वेळीच कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरु लागली आहे. रुग्णांना याबाबत अनेक तक्रारी करुनही काहीही उपयोग होत नसल्याने संपूर्ण कारभार ढेपाळला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
































































