परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीची दारू, चरसच्या विळख्यातून सुटका करा

परळ बेस्ट वसाहतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘बी’ इमारतीच्या मागील बाजूस चरस गांजा पिण्यासाठी वसाहतीबाहेरील तरुण येऊन गैरप्रकार  करीत आहेत. ‘पी’ आणि ‘सी’ इमारतीच्या मागे तर दारूचा अड्डाच तयार करण्यात आला आहे. याचे गंभीर परिणाम वसाहतीला सहन करावे लागत आहेत. त्यामुळे बेस्ट वसाहतीची दारू, चरसच्या विळख्यातून सुटका करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

याबाबत काळा चौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक जाधव यांना निवेदन देण्यात आले. असे प्रकार निदर्शनास मुंबई पोलीस 100 क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले. यावेळी बेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रूपेश पाडावे, सेव्रेटरी एकनाथ सणस, संतोष गायकवाड यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.